कराड – येथील चर्च परिसरात गांजा विकणार्या पवन सुभाष डावरे (वय 18, रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि यासर कादर शिकलगार (वय 20, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कराड) यांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी (दि. 23) रात्री ताब्यात घेतले. या कारवाईत 25 हजार रुपये किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरात अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना दिल्या होत्या.
कराड शहरातील चर्च परिसरामध्ये दोन जण गांजा विकत असल्याची माहिती राजू डांगे यांना मिळाली. त्यानुसार डांगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून पवन डावरे आणि यासर शिलकगार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 25 हजार रुपये किमतीचा सव्वा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, अझर शेख, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, हवालदार शशी काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख यांनी ही कारवाई केली.