मंत्रालय पातळीवरून प्रश्न प्राधान्याने सोडविणार
राजगुरूनगर –खेड तालुक्यातील शिक्षण संस्थांनी आपापल्या अडचणी लेखी स्वरूपात द्या आपले प्रश्न मंत्रालय पातळीवरून प्राधान्याने सोडविण्यात येतील. शिक्षणमंत्री व पालकमंत्री यांच्याशी बैठक करून प्रश्न सोडवू, असे आश्वासन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राजगुरूनगर येथे केले.
राजगुरूनगर येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालयात संस्थाचालक शिक्षण मंडळ आयोजित स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शिक्षण संस्थाचालकांना मार्गदर्शन करताना आमदार मोहिते पाटील बोलत होते.
यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते पाटील, अनिल मेहेर, महेश ढमढेरे, राजेंद्र भोसले, प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, बाळासाहेब मुळीक, शिवाजी घोगरे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य नीलिमा पाटील यांच्यासह तालुक्यातील शिक्षण संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहमेळाव्यात मांडण्यात आलेले प्रश्न समस्या उपाय याबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंत्रालय पातळीवर त्याचे निरसन केले जाणार आहे. संस्थाचालकांनी एकजूट करावी, त्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटतील.
संस्था उभी राहण्यामागे दुसऱ्यांचे श्रेय
माझी शिक्षण संस्था उभी राहण्यामागे दुसऱ्या संस्थेचे श्रेय आहे. हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळावर मी सदस्य आहे; मात्र आमदार झाल्यानंतर या शिक्षण संस्थेवर उपाध्यक्ष, सचिव, संचालक पदावर नियुक्ती होणे क्रमप्राप्त असते; मात्र संबंधित संस्थेने या पदावर घेणे टाळले. तेव्हाच ठरवले आपली शिक्षण संस्था काढायची. त्यानंतर शिक्षण संस्था काढली, दिलीप वळसे पाटील शिक्षणमंत्री होते तर विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांनी मला मोठी मदत केल्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.