पुणे – किरकोळ देखभाल दुरुस्तीअभावी असुविधांच्या गर्तेत अडकलेल्या महापालिकेच्या जलतरण तलावांना अखेर दुरुस्तीसाठी निधी मिळणार आहे. पुढील काही दिवसांत 14 क्रीडा संकुलांची दुरूस्ती केली जाणार असून त्यासाठी 3 कोटींच्या खर्चास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. यात शहरातील 14 प्रमुख जलतरण तलावांचा समावेश आहे.
या तलावांच्या ठिकाणी फुटलेल्या फरशा, बाके नसणे, छताला गळती, उखडलेल्या भिंती, तसेच इतर काही सुविधा नाहीत. मात्र, प्रत्येक वेळी निधी नसल्याचे कारण देत अथवा अंदाजपत्रकात कमी निधी असल्याचे सांगत या तलावांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यानंतर प्रशासनाने क्रीडा संकूल तसेच जलतरण तलावांच्या दुरुस्तीचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांपेक्षा कमी खर्च असलेल्या तलावांची दुरुस्ती केली जाणार आहे.
शहरात 37 पैकी 31 जलतरण तलाव सुरू आहेत. तर 6 ठिकाणी मोठ्याप्रमाणात दुरुस्तीची कामे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या ते बंद आहेत. दिवाळीनंतर जलतरण तलावांमध्ये नागरिकांची गर्दी वाढते. मात्र, गेल्या काही वर्षात या तलावांचे भाडे तसेच निविदा प्रक्रियांचा वाद तसेच करोना काळामुळे त्यांची नियमित देखभाल दुरूस्ती झालेली नाही. परिणामी, अनेक तलावांमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामांची आवश्यकता आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये याबाबत चर्चा होतात. मात्र, लगेच मार्चमध्ये अंदाजपत्रक संपल्यानंतर ही कामे होत नाहीत. त्यामुळे यंदा तलावांवर गर्दी वाढण्याआधीच दुरुस्ती चा निर्णय घेतला आहे.
या तलावांचा समावेश
छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव वारजे, वांजळे जलतरण तलाव – वडगाव, जलतरण तलाव – खराडी, कै. निळू फुले जलतरण तलाव – घोरपडी पेठ, बॅडमिंटन हॉल – कर्वेनगर, कै. शिवाजीराव ढुमे क्रीडा संकुल – पर्वती, कै. बापूसाहेब केदारी जलतरण तलाव – वानवडी, गाडगीळ तलाव – शनिवार पेठ, कै. ना. ग. नांदे जलतरण तलाव, शिवाजीनगर जलतरण तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर तलाव कौसरबाग, पिराजी कोयाजी डांगमाळी, जलतरण तलाव हडपसर, हभप बारटक्के जलतरण तलाव-वारजे, छत्रपती शाहू महाराज तलाव-सोमवार पेठ.