नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून २ हजार कोटीचा डीपीआर बनविण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने १५ वर्षात जुन्नर तालुका पर्यटनाने परिपूर्ण होणार आहे, अशी माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डीपीआर तात्काळ तयार करण्याचे आदेश पर्यटन विभागाला दिले असून या संदर्भात जुन्नर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आमदार बेनके यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीला पर्यटन संचालन विभागाच्या उपसंचालिका क्षमा पवार, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, महसूल विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह जुन्नर तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.
बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्याला पर्यटन दर्जा मिळाला. परंतु पर्यटनाला वाव देण्याच्या दृष्टीने निधी मिळाला नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यटन विभागाला सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यटनासाठी पहिल्या टप्प्यात १०० कोटी असून एकूण पंधरा वर्षात २००० हजार कोटीचा डीपीआर तयार करून शासन त्याचा जीआर काढणार आहे. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ले यासह आणखी २० ठिकाणे पहिल्या टप्प्यात पर्यटन विकासासाठी घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली.
कन्सल्टंटद्वारे सर्व माहिती गोळा होणार
पर्यटनाच्या २० ठिकाणी नामफलक, दिशादर्शक फलक व क्यूआर कोडद्वारे सर्व माहिती पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. पर्यटनाची थ्रीडी देखील तयार केली जाणार असून पर्यटकांना गाईडशिवाय पर्यटनाची माहिती तसेच धार्मिक स्थळांची माहिती उपलब्ध होणार आहे. पर्यटन ठिकाणची माहिती संकलन करण्यासाठी एक टेंडर देण्यात आले आहे. दि. ६ जानेवारीपर्यंत कन्सल्टंटद्वारे सर्व माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानंतर पर्यटनाच्या संपूर्ण माहितीचा डाटा तयार केला जाणार आहे.
पर्यटकांच्या माहितीसाठी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, पर्यटन क्षेत्राशी संबंधितांची माहिती संकलन करून सर्व माहिती तहसीलदार यांच्याकडे सादर केली जाईल. त्यानंतर तहसीलदारांमार्फत कन्सल्टंट यांना माहिती दिली जाईल. कन्सल्टंट माहितीच्या आधारे त्या ठिकाणचा इतिहास, मंदिर यासह आदी माहिती क्यूआर कोडमध्ये देणार असून त्याची थ्रीडी बनवली जाणार आहे.