काळ्या फिती लावून जोरदार घोषणा देत मनसे स्टाइलने आंदोलन
राजगुरुनगर : राजगुरुनगरमधील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या केटीईएस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांना फी मध्ये सवलत मिळावी, मासिक, त्रैमासिक अथवा दोन टप्प्यांत फी भरण्यास सवलत मिळावी व शाळेच्या पहिल्याच दिवशी फी साठी मुलांना वर्गातून बाहेर काढण्यासाठी जबाबदार असलेल्या संचालकांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाळेच्या गेटवर काळ्या फिती लावून जोरदार घोषणा देत मनसे स्टाइलने आंदोलन करण्यात आले.
शैक्षणिक फी न भरल्याचे कारण पुढे करीत राजगुरुनगर मधील खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या केटीईएस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रशासनाने व शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याऐवजी त्यांना वर्गातून बाहेर हाकलत उन्हात बसवले. याबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालक असलेले व मनसेचे शहर अध्यक्ष सोपान डुंबरे यांनी याबाबत जाब विचारला मात्र त्यांना एका महिला संचालकांनी अरेरावी केली. त्यानंतर हे प्रकरण चिघळले, अनेक पालक एकत्र येत संताप व्यक्त करण्यात आला. आज याचे रूपांतर आंदोलनात झाले.
एक महिला संचालक व मनसेचे सोपान डुंबरे तसेच नितीन ताठे यांच्यात मुलांना फीसाठी बाहेर का काढले या मुद्द्यावर वादावादी झाली. फी घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात बसू देणार नाही अशी संचालकांची भूमिका असल्याने हे प्रकरण प्रकरण वाढले. फी मध्ये सवलत मिळावी, फी टप्प्या टप्प्याने घ्यावी व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी बाहेर काढणाऱ्या संचालकांचा राजीनामा घ्यावा यासाठी आज मनसेच्या वतीने आंदोलन झाले. या आंदोलनात अनेक पालक सहभागी झाले होते.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष मनोज खराबी, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, जिल्हा संघटक अभय वाडेकर, नितीन ताठे, विद्यार्थी सेनेचे सनी दौंडकर, प्रफुल्ल ताये, बारकू पवळे, वासिम पटेल, प्रवीण चव्हाण, स्वप्नील प्रभुलिंग, महेश शिरोळे. संतोष मांजरे उपस्थित होते. दरम्यान आंदोलनात कामगार सेना जिल्हाध्यक्ष मनोज खराबी, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, जिल्हा संघटक अभय वाडेकर, शहर अध्यक्ष सोपान डुंबरे, नितीन ताठे, पालकांची भाषणे झाली. कार्यकर्त्यांनी शाळेच्या कारभाराबाबत जोरदार घोषणाबाजी केली. संचालक डॉ. बिचकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मनसेच्या मागणीचे निवेदन शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गुजराथी, ज्योती ठाकूर यांनी स्वीकारले.
पहिल्याच दिवशी शाळेत आनंदाने आलेल्या मुलांना फी साठी बाहेर काढण्यात आले हा विद्यार्थ्यांच्या मनावर मोठा परिणाम करणारी बाब आहे. माझ्या बाबांकडे पैसे नाहीत, ही बाब मुलांच्या मनावर परिणाम करणारी आहे. मुजोर संचालकांमुळे विद्यार्थी आणि पालकांची पिळवणूक केली जात आहे. काल विद्यार्थ्यांचा हिरमोड केला ही बाब निंदनीय आहे. विद्येचे माहेरघर असल्याने आम्ही निवेदन देत आहोत. मुजोर संचालकावर कारवाई झाली पाहिजे तसे झाले नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल.
– समीर थिगळे, जिल्हाप्रमुख मनसे