तळेगाव ढमढेरे : येथील भीमाशेत येथे संत शिरोमणी सावता महाराज व श्री हनुमान मंदिराच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवात मेणबत्तीनी केलेली प्रकाश भाविकांच्या नजरा खिळून ठेवल्या होत्या.
कलश पूजन व वीणापूजनाने अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ झाला. अखंड वीणा, पहाटे 4 वाजता काकडा, सकाळी सहाला विष्णू सहस्त्रनाम, 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, 10 वाजता गाथा, सायंकाळी 5 वाजता हरिपाठ, रात्री 9 नंतर कीर्तन असा दैनंदिन नित्याचे कार्यक्रम संपन्न झाले.
हभप आत्माराम महाराज देवधरे, सृष्टी गायकवाड, संतोष महाराज खेडकर, स्वप्नील महाराज दौंडकर, कृष्णा महाराज पिंगळे, बापू महाराज टेंगळे, किरण महाराज भागवत, गणेश महाराज शिंदे तर अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता हभप गणेश महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
भीमाशेत येथे गेली सोळा वर्षांपासून सावतामाळी तरुण मंडळ भीमाशेत नं. 1, 2, 3चे ग्रामस्थ यांच्या वतीने संत सावतामाळी, हनुमान, विठ्ठल रुखमाई व गणेश मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
सप्ताहाच्या सातव्या दिवशी भव्य दिंडीसोहळा व दीपोत्सव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमानिमित्त तळेगाव ढमढेरे येथील बारा वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.