आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला यश
वाघोली – वाघोलीमधील विविध समस्या सोडवण्यासाठी पुणे महान-गरपालिकेचे अधिकारी व शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसमवेत पुणे महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाघोलीतील सर्व समस्या तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तर यापूर्वी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या विकास कामांसाठीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिली.
आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वाघोली गावातील ड्रेनेज लाइनचे अपुर्ण काम, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, नगर रस्ता व काही अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण, बकोरी व फुलमळा रस्ता, नगर – पुणे रस्त्यावरील वाहतूककोंडी, अद्ययावत रूग्णालयांची नितांत आवश्यकता, पीएमपीएमएल बसेसच्या फेऱ्या वाढविणे तसेच नवीन रूट सुरू करणे, नवीन घरांच्या टॅक्स नोंदणी आणि इतर अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस वाघोली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, जयश्री सातव, सुनील जाधवराव, किसन जाधवराव, ज्योती पाचर्णे, बाळासाहेब शिंदे, संजीव कुमार पाटील, नितीन जैन, प्रसाद केळकर, संदीप थोरात, योगेश सूर्यवंशी, गुरुमितसिंह उपस्थित होते.
….या कामांना मिळाली मंजुरी
काळुबाई नगर ते आव्हाळवाडी रस्ता, बकोरी फाटा ते म्हसोबा मंदिर, म्हसोबा मंदिर ते केसनंद रस्ता, केसनंद रस्ता ते आव्हाळवाडी रस्ता, बायफ ररस्ता ते दादा सातव घर या परिसरातील सांडपाण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पूर्वरंग सोसायटी ते कापुरी विहीर, सार्थक ते सांडवा लाइनसाठी दहा कोटीं निधी मंजूर झाला आहे.
वाघोली येथे महानगरपालिकेच्या वतीने हॉस्पिटल बांधकामासाठी पाच कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महानगरपालिकेत समाविष्ट 23 गावांचा सांडपाण्याचा आराखडा तयार करून एसटीपी प्लॅन व ड्रेनेज लाईन कामासाठी महानगरपालिकेने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.