पिंपरी – नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा लवकर व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने व्हॉट्सऍप चॅटबॉट सुरू केले. या व्हॉट्सऍप चॅटबॉटवर दररोज 100 हून अधिक तक्रारी येत आहेत. आलेल्या तक्रारींपैकी 95 टक्क्याहून अधिक तक्रारींचा निपटारा होत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. यामुळे नागरिकांना आपल्या समस्या आता थेट प्रशासनाकडेच मांडाव्या लागत आहेत. नागरिकांना आपल्या समस्या सहजरित्या मांडता याव्यात आणि त्यांचे वेळेत निराकारण व्हावे, यासाठी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद आणि समन्वय निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. त्यापैकी व्हॉटस्ऍप चॅटबॉट हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रोज सुमारे शंभर आणि अनेकदा शंभरहून अधिक तक्रारी या व्हॉटस्ऍप चॅटबॉटच्या माध्यमातून येत आहेत.
नागरिकांना नगरसेवकांशिवाय थेट प्रशासनाकडे आपल्या समस्या मांडता याव्यात आणि त्यांचे निराकरण व्हावे, यासाठी माजी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 15 ऑगस्ट 2013 रोजी सारथी हेल्पलाइन सुरू केली. 8888006666 हा क्रमांक सारथीसाठी देण्यात आला आहे.
अगदी किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्याचे आठ दिवसांत निराकरण करावे, इतर तक्रारींचे स्वरूप पाहून त्या किती दिवसांत निकाली काढता येईल, याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पॉईंटद्वारे मूल्यमापन करण्यात येत होते. तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना 50 पॉईंट झाल्यावर मेमो, 75 पॉईंटला कारणे दाखवा नोटीस आणि 100 पॉईंटला खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात येत होते. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी अधिकारी तक्रारींचा निपटारा जलद गतीने करीत होते. मात्र आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली झाल्यावर सारथी हेल्पलाइन सुरू राहिली मात्र तक्रारींच्या निपटाऱ्याची गती काहीशी मंदावली.
कामाला गतिशीलता
महापालिकेने सुरू केलेल्या सारथीचे देशभरात कौतुक झाले. त्याचेच पुढचे पाऊल महापालिकेने टाकले आहे. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सारथीच्या 8888006666 या क्रमांकावर 5 जुलै 2022 पासून व्हॉटस्ऍप चॅटबॉट सुरू केले. या क्रमांकावर नागरिकांना फोटोसह तक्रारी करता येणार आहे. गेल्या 20 दिवसांत व्हॉटस्ऍप चॅटबॉटवर दोन हजार 149 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी दोन हजार 47 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. तर 102 तक्रारींचे निराकरण करण्याचे काम सुरू आहे.
फोटोसह तक्रार
व्हॉटस्ऍप चॅटबॉटवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये कचरा साचणे, ड्रेनेज लाइन तुंबणे, मच्छरांचा उपद्रव, धूर फवारणी, रस्त्यावरील बेवारस वाहने, पावसाचे पाणी साचणे, अशा प्रामुख्याने तक्रारी येत आहेत. व्हॉटस्ऍप चॅटबॉट आलेल्या तक्रारी संबंधित प्रभाग आणि संबंधित विभाग यांच्याकडे पाठविण्यात येतात. तक्रारींची पूर्णता केल्यावर सदरची माहिती महापालिकेचे अधिकारी व्हॉटस्ऍप चॅटबॉटकडे फोटोसह पाठवितात. आलेली माहिती तक्रारदाराला फोटोसह पाठविण्यात येते. यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास अधिक दृढ होत चालला आहे.