अडीच महिने बाकी असतानाही कुरुळी, मरकळमध्ये मूर्तिकारांची जोरदार लगबग सुरू
चिंबळी : गणेशोत्सवास अजून अडीच महिने बाकी आहेत, तरीही कुरुळी, मरकळ येथील गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तिकारांची जोरदार लगबग सुरू झाली आहे. सुमारे अडीच महिने अगोदरच बाप्पाच्या मूर्ती बनविण्यात मूर्तिकार गुंतले आहेत.
महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला यावर्षी 19 सप्टेंबरला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कुरूळी व मरकळमधील गणेशमूर्ती शाळांमध्ये श्री गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची जोरदार लगबग सुरू झालेल आहे. गणेशोत्सवात भाविकांचे मन उत्साहाने भरून जाते. या उत्सवाची तयारी दोन-तीन महिने अगोदरच जोरदार सुरू होते. अलीकडे कामगारांच्या मजुरीचे दर वाढले असले, तरी गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये कुशल कारागिरांच्या साथीने मूर्ती घडविण्याचे काम सुरू आहे.
या कलेत पारंगत असलेल्या कलाकारांना सध्या प्रचंड मागणी आहे. कुरूळी व मरकळमधील गणेश मूर्तिशाळा आहेत. मूर्तिकारांना माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत कुटुंबीयांसह, सहकार्य करणारे कारागीर या कामात गुंतले आहेत. सध्या विविध प्रकारच्या आकर्षक बाप्पाच्या मूर्ती बनविण्याची लगबग गणेशमूर्ती शाळांमधून सुरू झाली आहे. गणेशभक्तांनीही बाप्पाच्या मूर्तीसाठी पाट देण्यास प्रारंभ केलेला आहे.
मूर्तिकार सदैव गणपती बाप्पा विविध रूपात साकारण्याचा प्रयत्न करत असतो. यंदा अधिक मासामुळे जास्तीचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे बाप्पाच्या नवीन स्वरूपातील मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकारांना मोठा वाव मिळाला आहे. या संधीचा फायदा घेत कुरुळी, मरकळ येथील कारखान्यांमध्ये बाप्पाचे विविध रूपे साकारण्याचे काम मूर्तिकार करत आहेत. यावर्षी किमान हजारो मूर्ती साकारल्या जातील, असा विश्वास कारखानदारांना आहे.