अरुण पवार
पाटण – नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांना घेऊन भाजप-शिंदे गटाच्या युतीत सामील झाले असून याचे पडसाद पाटण विधानसभा मतदारसंघात उमटणार आहेत. ज्यावेळेस शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळेस शंभूराज देसाई यांना विविध टीका व अडचणींचा सामना करावा लागला. त्यातून ते आता निभावले आहेत. मात्र आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पाटणच्या पाटणकर घराण्याची भूमिका शरद पवारांबरोबर एकनिष्ठ राहण्याची दिसते. तर आता अजित पवार यांचा पाटण तालुक्यात वेगळा गट निर्माण होणार असे चित्र आहे. त्यामुळे पाटणकर गटातून कोण-कोण समर्थक अजित पवारांना जाऊन मिळतात? हे पाहायला मिळणार असल्याने पाटणकर गटाची एकप्रकारे अग्निपरीक्षाच चालू आहे.
पाटण तालुक्यात नेहमीच देसाई विरुद्ध पाटणकर घराणे अशी राजकीय लढत पहावयास मिळाली. सध्याचे राजकारण पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असून ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. याउलट माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे शरद पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर हे आत्ताच्या घडीस मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी राजकीय सामना करत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेऊन एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन विभक्त झाले. त्यामध्ये पाटणचे आ. शंभूराजे देसाई हेही सामील होते. त्यानंतर शंभूराज यांना खोके, गद्दार अशा शब्दांचा अप्रत्यक्षपणे सामना करावा लागला होता. मात्र, टीकेला भीक न घालता हत्तीची चाल बाळगून पाटण तालुक्यात आपले राजकीय वजन वाढवत त्यांनी जोमाने गती घेतली. दरम्यान, शंभूराज देसाई यांच्या भूमिकेमुळे देसाई गटात कोणती म्हणावी अशी मोठी फुट पडली नाही. परंतु, आता वेळ आली आहे, पाटणकर गटात काय-काय हालचाली होतात हे पाहण्याची. कारण, नुकताच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पाटण तालुक्याचा दौरा करून आगामी हालचालींबाबत चाचणी करून अंदाज घेतला होता. या दौऱ्यामध्ये अजित पवार यांनी पाटण तालुक्यात आपल्या गटाची बांधणी कशी करायची? याची चाल नक्कीच खेळली असणार अशी तालुक्यात चर्चा आहे.
सध्या तरी पाटण तालुक्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, त्यांचे पुत्र सत्यजित पाटणकर यांची भूमिका शरद पवार यांच्याबरोबर राहायची असल्याचे दिसत असले, तरी पाटण तालुका राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांचे अनेक समर्थक असून ते आता उघड भूमिका घेणार का? हेही लवकरच समोर येईल.
शंभूराज देसाई यांनी ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यावेळेस देसाई गटातील हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच कार्यकर्ते नाराज होऊन ठाकरे गटात सामील झाले. त्यामुळे देसाई गटामध्ये कसलीही मोठी फूट पडली नाही. त्यानंतर पाटण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत, पाटण बाजार समिती, सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये देसाई गटाने मोठे यश मिळवल्याचे दिसून आले.
यापुढे जर पाटण तालुका राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. तर त्याचा फायदा व फटका कोणाला बसेल? हे तालुक्यातील जनता ओळखून आहे. सध्या पाटण तालुक्यात देसाई गट आणि पाटणकर गट म्हणजेच अनुक्रमे शिंदे
गट आणि शरद पवार गट अशीच लढाई यापुढे होणार, असे दिसते. परंतु, या दोघांना “टेकू’ देण्याचे काम करणाऱ्या भाजप, कॉंग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि आता होणारा अजित पवार गट अशा सर्वांची भूमिका देसाई आणि पाटणकर गटासाठी कशी फायद्याची ठरते आणि कोणाचे नुकसान करते, हे आगामी काळात पहावयास मिळणार आहे.
ढेबेवाडी ठरणार पाटणच्या राजकारणाचा केंद्रबिंदू
राज्याच्या राजकारणात वर्षभरापासून बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामध्ये शिवसेना आणि आता राष्ट्रवादीत फूट पडली असून “आधे इधर… आधे उधर…’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. शंभूराज, ढेबेवाडी विभाग पुढील निवडणुकांमध्ये कोणाची बाजू घेणार, हे पाहायस मिळेल. कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नुकतेच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी ढेबेवाडी भागाच्या दौरा केला होता. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही ढेबेवाडी भागात जाऊन आलेत. त्यामुळे ढेबेवाडी भागाला राजकीय महत्व आले असून तो पाटणच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे दिसून यात आहे.