पुणे – महापालिकेकडून आजी-माजी नगरसेवक तसेच आजी-माजी कर्मचार्यांसाठी राबविण्यात येणार्या अंशदायी वैद्यकीय योजनेचेही संगणकीकरण केले जाणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असून २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजने अंतर्गत कर्मचार्यांना वैद्यकीय उपचाराची १० टक्के रक्कम भरावी लागते तर ९० टक्के रक्कम महापालिकेकडून भरली जाते.
मात्र, या योजनेत अनेक कर्मचारी तसेच नगरसेवक सासू-सासरे तसेच आई-वडील आणि २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांचेही उपचार घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे, महापालिकेकडून शहरी गरीब योजनेप्रमाणेच या योजनेचेही संगणकीकर केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
गैरप्रकारांना बसणार आळा
महापालिकेकडून अंशदायी योजने अंतर्गत करण्यात येणार्या उपचारांना कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे, महापालिकेस या योजनेवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या योजनेत नगरसेवक पती पत्नी त्यांची २५ वर्षाच्या आतील मुले तसेच आई-वडील किंवा सासू सासरे यांच्या पैकी एक यांंना उपचाराचा लाभ दिला जातो.
मात्र, कार्डावर अथवा रेकाॅर्डवर याची कोणतीही नोंद नसल्याने तसेच माहिती नसल्याने अनेक जण २५ वर्षांपेक्षा जादा वयाची मुले, आई-वडील तसेच सासू सासर्यांचेही उपचार करतात आणि नंतर बिले महापालिकेस सादर केली जातात. त्यामुळे, महापालिकेच्या लेखा परीक्षणात मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचेही संगणकीकरण केले जाणार आहे.