ठोसेघर – सातारा तालुक्यातील दरे बु (अंबेदरे) प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विदयार्थ्यांसाठी बाजाराच्या उपक्रमाचे आयोजन केले होते. भाजी घ्या भाजी ताजी भाजी, कांदा, मुळा, भाजी घ्या हे बालचमूंचे बोबडे बोल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. माजी उपसभापती अरविंद चव्हाण, ज्येष्ठ नागरिक महेंद्र नाचणे यांनी बाजारास भेट देऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या बाजारातून भाजी खरेदी करण्यासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन कमिटी, लोकप्रतिनिधींनी मोठया प्रमाणावर गर्दी केली. पुस्तकी ज्ञानाचे दैनंदिन व्यवहारात उपयोजन उपक्रमासाठी नागरिकांतून प्रतिसाद मिळाला. विदयार्थ्यानी विविध प्रकारच्या पालेभाज्यांसह खादयपदार्थाची विक्री केली. बाल वयापासूनच व्यावहारिक ज्ञान अवगत होण्याच्या उद्देशाने भरविण्यात आलेल्या बाजारातून दैनंदिन व्यवहारातील गणितीक्रिया सहज आकलन होण्यास मदत झाली. हजारो रूपयांची आकडेमोड करण्यास मदत झाली .प्रत्यक्ष आपापल्या शेतातून आणलेल्या भाजीची चांगल्या प्रकारे विक्रीतून कृतीयुक्त अनुभव मिळत असल्याने मुलांचा उत्साह वाढला होता.
उपक्रमातुन गणिताबद्दलची गोडी वाढण्यास मदत झाली. बाजारातील साडेचार हजार रूपयांची उलाढाल करून खरेदी, विक्री, नफा, तोटा या संकल्पना चार भिंतीच्या बाहेर मुक्त वातावरणात शिकायला मिळाल्याने विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. चिमुकल्यांनी भेळ, वडापाव, चणे- शेंगदाणे, इडली, पॅटीस यासारख्या खाद्यपदार्थाची तसेच मेथी, चाकवत, वांगी, शेवगा, मुळा, कांदा आदींची विक्री केली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ,पोलिस पाटील, तसेच गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सौ. माधवी देशमाने, उपशिक्षिका माधुरी दिक्षे, एस. के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बाजाराचे आयोजन झाले.