सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शनिवार हा मतदार गृहभेट दिवस म्हणून सातारा स्वीप कक्षाकडून राबविण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत सातारा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना एकाच दिवशी एक लाख कुटुंबांच्या गृहभेटी करत शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
सातारा लाेकसभा मतदारसंघात स्वीप कक्षामार्फत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याशनी नागराजन यांनी याबाबत विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी शनिवारी जिल्ह्यात गृहभेटीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार ही मोहीम प्रभावीपणे राबवून एका दिवसात एक लाख कुटुंबांना गृहभेटी देण्यात आल्या. मतदान करणे का गरजेचे आहे, प्रत्येकाने मतदान करावे याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली. मतदारांना मतदानादिवशी काही अडचणी येऊ नये म्हणून वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना यावेळी सूचना केल्या.
सातारा जिल्हा परिषदेमार्फत गावातील ग्रामसेवक व कृषीसहाय्यक दि. ३ ते ७ मे पर्यंत दिवसातून तीन वेळा गृहभेट देऊन शंभर टक्के मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी कार्यरत राहतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या मदतीसाठी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, बचतगट ग्रामसंघ यांचा समावेश असणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना शपथ
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजागृतीसाठी शनिवारी सातारा औद्योगिक वसाहतीमधील कूपर कंपनी व टॉप गिअर कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्व सांगून सर्वांनी आपल्या कुटंब व नातेवाइकांसह शंभर टक्के मतदान करण्याबाबत आवाहन केले. सातारा स्वीप कक्षामार्फत एमआयडीसीतील कंपनी कामगारांना मतदान जनजागृतीचे पोस्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, तेजस गमरे, जिल्हा परिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निलेश घुले यांनी कामगारांना मतदानाची शपथ दिली.