नारायणगाव (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना वन विभागाचे उपवन संरक्षक अधिकारी अमोल सातपुते निष्क्रिय वागत असून तात्काळ निलंबित करण्याची मागणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे.
सोनवणे यांच्या रायगड निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी वडगाव आनंदचे माजी सरपंच प्रदीप देवकर, संतोष घोटणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपवन संरक्षक अधिकारी अमोल सातपुते बिबट्याला पकडण्यासाठी गंभीर उपाय योजना न करता शेतकर्यांवर गुन्हे दाखल करण्यात मग्न असून अशा नाठाळ अधिकार्याला तात्काळ निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे शुक्रवारी (दि.24) पासून आळेफाटा चौकात सकाळी दहा वाजल्यापासून अन्नत्याग बेमुदत उपोषण करणार आहेत.
या आहेत प्रमुख मागण्या…
1.माणिकडोह येथील नव्याने बिबट निवारा केंद्रासाठी संपादित केलेल्या जागेवर 300 बिबटे ठेवण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे
2. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे चार तालुके आपत्ती क्षेत्र म्हणून जाहीर करून दिवसा थ्री फेज लाइट देण्यात यावी
3. बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी पकडलेल्या सर्व बिबट्यांना अभयारण्यात सोडून द्यावे
4. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
5. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मानव मृत्यूच्या संख्येत कामालीची वाढ झाली असून जुन्नर तालुक्यासाठी वन विभागाचे मनुष्यबळ वाढवण्यात यावे. 6. बिबट्यांना पकडण्यासाठी तीनशे पिंजरे देण्यात यावे.
7. धनगर समाज हा भटकणार्या समाज आहे त्यांचे प्रत्येक धनगर वाड्यावर आवाजाची बंदूक देण्यात यावी.
7. वनखात्याने ज्या शेतकर्यांवर गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे