७ जणांवर गुन्हा दाखल : आंदोलनात उद्धव ठाकरे गटाचा सहभाग
आळेफाटा : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १४ दिवसांसाठी आंदोलन, निदर्शनास बंदी असल्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. तरी देखील जुन्नर मतदारसंघाच्या दौऱ्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला गुरुवारी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर खंडागळे, शरद पवार गटाचे सूरज वाजगे यांच्यासह मराठा समाजाच्या आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणी सर्वांच्या विरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अजित पवारांनी मराठा समाजाला उद्देशून केलेल्या वक्तव्याचा निषेधार्ह मराठा संघटनांकडून हे झेंडे दाखवण्यात आले. मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी अजित पवारांनी हा दौरा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र मराठा समाजाच्या या मागणीला झुगारून अजित पवार दौऱ्यावर आले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी इतर आंदोलकांसह अजित पवारांच्या ताफ्याला आळेफाटा चौकात काळे झेंडे दाखवले.
१२ जानेवारी ते २५ जानेवारी अशा १४ दिवसांच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे आदेशाचे उल्लंघन केले. तसेच जमावबंदी आदेशाची पायमल्ली केल्यामुळे आळेफाटा पोलिस ठाण्याचे गोपनीय अमलदार विनोद गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर रावजी खंडागळे, सुरेश शहाजी वाजगे, सुधीर पंढरीनाथ घोलप, अनिल मारुती गावडे, योगेश रामदास तोडकर, राजेश सदाशिव भोर, चंद्रभान विठ्ठल गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पुढील तपास करीत आहेत.