पुणे : गेल्या 24 तासांत किमान तापमानात वाढ झाल्यामुळे शहरातील थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. शनिवारी (दि. 27) किमान तापमान 12.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दरम्यान, आज दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडीचा कडाका, असे वातावरण पुणेकर अनुभवत आहे.
दि. 23 आणि 24 या दिवशी यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. 7 अंशापर्यंत तापमान खाली आल्यामुळे हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव पुणेकरांनी घेतला. मात्र, मागील दोन दिवसांपासून किमान तापमान दोन ते तीन अंशाने वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे.
आज सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा होता. मात्र, दुपारनंतर कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचा चटका जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. दि. 29 जानेवारीनंतर किमान तापमानात घट होणार असल्याने पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
अग्नेय दिशेकडून येणार्या वार्यांमुळे महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य भागात आद्रता येत आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली. अहमदनगर येथे सर्वात कमी 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ जळगाव येथे 9.9, माळेगावला 10, गोंदिया 10.5, यवतमाळ 11, नाशिक 11.8, अकोला 12, ब्रह्मपुरी 12.2, पुणे 12.7, महाबळेश्वर 14.5, सातारा 16 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान
मालीन 11.1, एनडी 11.6, हवेली 11.8, शिरूर 12, बारामती 12.2, शिवाजीनगर 12.7, पाषाण 13.4, तळेगाव 13.7, लवासा 14.2, इंदापूर 15.6, हडपसर 16, कोरेगाव पार्क 17, मगरपट्टा 18.2, वडगावशेरी 19.3