आरोपात काही तथ्यच नाही- माऊली ताकवणे
राहु – दौंड तालुक्यातील एकमेव सहकारी असणारा व आता भाडेतत्त्वावर दिलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यासंदर्भात राज्य सरकारने दौंडचे आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल कुल यांना क्लीन चिट दिल्यानंतर तालुक्यात कुल समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करीत निर्णयाचे स्वागत केले.
शिवसेना नेते (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी दोन महिन्यांपूर्वी भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळेस माजी आमदार रमेश थोरात व भाजपचे नेते नामदेव ताकवणे यांच्या पुढाकाराने खासदार राऊत यांनी जाहीर सभा देखील घेतली होती. त्यामुळे दौंडमध्ये राजकीय वातावरण तापले होते. जिल्ह्यात भीमा पाटस काररखाना हा राजकारणात तापलेले केंद्र बनलेले होते.
यासंदर्भातील अनेक कागदपत्रे राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली होती. परंतु सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत लेखा परीक्षण अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत नसल्याचे सांगितल्यानंतर आमदार कुल यांच्या समर्थकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.