देऊळगावराजे – दौंड तालुक्यातील शिरापूर येथे बिबट्या वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्याने शेळी आणि बोकडावर हल्ला केला आहे. गणेशनगर मधील शेतकरी सुभाष होलम यांची शेळी व बोकड दोन दिवसांपासून बिबट्याने फडशा पाडला आहे.
ज्या ठिकाणी शेळी आणि बोकड खाल्ले आहेत. त्या ठिकाणी बिबट्याचे पायाचे ठसे उमटलेले आहेत. त्यामुळे शिरापूर परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले नसून या बिबट्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
शिरापूरमध्ये वन विभागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये पूर्ण काटेरी झाडे, झुडपे असल्यामुळे विविध वन्यप्राणी आहेत. पण बिबट्या हा प्रथमच या ठिकाणी आल्यामुळे वनविभागाच्या कडेने असलेले शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या वस्त्यावरील नागरिक भयभीत झाले आहेत.
वनपाल निखिल गुंड म्हणाले की, शिरापूर येथे बिबट्याचा वावर असून ज्या ठिकाणी बिबट्या दिसेल. त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. या ठिकाणी बिबट्या असल्याचे वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे.