पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक व लहान मुले डोळ्यांच्या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्याचप्रमाणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये देखील डोळ्यांच्या साथीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
आळंदीमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. आळंदीतील विविध संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांचे सर्वाधिक प्रकरणे यामध्ये समोर आली आहेत. आळंदीबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना देखील या साथीचा सामना करावा लागत आहे. शहरातील मोशी, दिघी, नेहरुनगर, डुडुळगाव, चिखली, जाधवनगर आदीसह विविध परिसरात डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचा नेत्र रोग विभाग मासूळकर कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात स्थलांतरित केलेला आहे. मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालयात सध्या दिवसाला डोळ्यांच्या विविध आजाराचे 150 ते 175 रुग्ण तपासण्यासाठी येत आहेत. त्यामध्ये डोळ्यांची साथ असलेल्या रुग्णांचे प्रमाण दिवसाकाठी 35 वर गेले आहे. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांनाच याचा त्रास होत आहे. रुग्णालयात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव
संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा लहान मुलांना अधिक त्रास होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये ही साथ वाढली आहे. विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवस त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर रोग प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या विद्यार्थ्याला पाच दिवस बरे होण्यासाठी कालावधी लागत आहे. त्यामुळे डोळ्याच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्यास पाल्याला शाळेत न पाठविण्याची सूचना तज्ज्ञ करत आहेत.
मासूळकर कॉलनी येथील रुग्णालयात दिवसाकाठी 35 रुग्ण डोळ्यांची समस्या असलेले आढळत आहेत. त्यांना रुग्णालयाच्या वतीने आय ड्रॉप दिले जात आहेत. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत हा त्रास आढळत आहे. लोकांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी गेल्यास खबरदारी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. रुपाली महेशगौरी, नेत्ररोगतज्ज्ञ, नेत्ररुग्णालय, मासुळकर कॉलनी.
ही काळजी घ्या वारंवार हात धुणे
चेहऱ्याला, डोळ्याला हात न लावणे
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल वापरू नये.
डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप घेणे.
सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर काळजी घेणे.