पुणे : आंबट-गोड चवीचे द्राक्ष म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा द्राक्षांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे. ही हंगामपूर्व द्राक्षे आहेत. येथील बाजारात दिवसाआड दोन ते अडीच टन द्राक्षांची आवक सध्या होत आहे.
द्राक्षांचा हंगाम डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सुरू होतो. गेल्या काही वर्षांपासून बाजारात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून हंगामपूर्व द्राक्षांची आवक मार्केट यार्डातील फळबाजारात सध्या सुरू झाली आहे.
मात्र, शेतकऱ्यांनी कष्ट घेऊन पीक वाचविले आहे. त्यामुळे हंगामपूर्व द्राक्षांची प्रतवारी चांगली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील द्राक्ष व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले. बाजारात आवक झालेली द्राक्षे सोनाका आणि तास-ए-गणेश जातीची आहेत. घाऊक बाजारात द्राक्षांच्या नऊ किलो पेटीचे भाव प्रतवारीनुसार 800 ते 1200 रुपये आहेत. प्लास्टिकच्या पाच किलोच्या पेटीचे भाव प्रतवारीनुसार 500 ते 800 रुपये आहे.
द्राक्षांची लागवड चांगली
द्राक्षांचा हंगाम सुरू होण्यास आणखी एक ते सव्वा महिन्यांचा कालावधी आहे. द्राक्षांचा हंगाम जानेवारी ते मे महिन्यांपर्यंत सुरू असतो. हंगाम सुरू झाल्यानंतर द्राक्षांची आवक टप्याटप्याने वाढून 50 टनांपर्यंत पोहोचते. यंदा द्राक्षांची लागवड चांगली झाली असून, हंगामात द्राक्षांची आवक मुबलक प्रमाणावर होईल.
सध्या बाजारात हंगामपूर्व द्राक्षांची आवक होत आहे. किरकोळ बाजारात द्राक्षांना फारशी मागणी नाही. मात्र, महाबळेश्वर, लोणावळा, कोकणातील फळ विक्रेत्यांकडून द्राक्षांना चांगली मागणी आहे. पर्यटनस्थळांवर द्राक्षांना चांगली मागणी असते. याबरोबरच गुजरात येथील बडोदा, अहमदबाद, सूरतसह गोव्यात द्राक्षे विक्रीस पाठविण्यात येतात.
– अरविंद मोरे, द्राक्षांचे व्यापारी, मार्केट यार्ड