ससून रुग्णालयाचे उपअधीक्षक सुजीत दिव्हारे
सविंदणे – ससून रुग्णालयात आलेल्या गोरगरीब रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे ससून रूग्णालयाचे उप अधीक्षक सुजीत दिव्हारे यांनी सांगितले.
शिरुर येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहावी 1993 बॅचच्या वतीने ससून रुग्णालयाच्या उप अधीक्षकपदी सुजीत दिव्हारे व सोलापूर विद्यापीठाच्या अधिष्ठातापदी शंकर नवले या दोन्ही मित्रांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान शिरूर येथे करण्यात आला. त्यावेळी दिव्हारे बोलत होते.
यावेळी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल घावटे, समर्थ पॅथॉलॉजीचे उदय शिंदे, शिरूर पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे, भाजप महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेश्मा शेख, संतोष कांबळे, दीपक लुंकड, किरण घेगडे, फिरोज शिकलकर, बालाजी अलमले, मनीष कोठारी, नितीन मुथा, संजय शितोळे, प्रा. संजय काळे, गणेश घाडगे, गणेश देशमाने, वरिष्ठ लिपिक संतोष झगडे, श्रीकांत फलके, इरफान शेख, महेश भोसले, सतीश धुमाळ, भरत गायकवाड, महेश ढेरे, रामदास गायकवाड, प्रदीप जगताप, विजय पवार, राजेंद्र वाखारे उपस्थित होते.
घरची परिस्थिती हलाखीची असतानाही शिक्षणासाठी परिस्थितीशी संघर्ष करून शिक्षण घेतले. 5 वी ते 10 वीचे सर्वांचीच बेताची परिस्थिती असलेले माझे मित्र हिच माझी ताकद असून त्यांच्याकडून मिळालेल्या उर्जेतून यशस्वी वाटचाल करीत असल्याचे दिव्हारे यांनी आवर्जून सांगितले.
मित्रांकडून मिळालेली कौतुकाची थाप आणि सन्मान हा अविस्मरणीय सन्मान असून त्यातून काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे दिव्हारे व नवले यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. संतोष शिंदे यांनी आभार मानले.