केतकावळे -भिवरी (ता पुरंदर) येथे रविवारी (दि. 20) अमराई पाझर तलावात बुडून कोंढवा (पुणे) येथील एका तरुणाचा मृत्यू झाल आहे. ही घटना रविवारी (दि. 20) दुपारच्या सुमारास घडली स्वप्नील मोहन टिळेकर (वय 22, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर अनिरुद्ध सोपान लोणकर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबतची माहिती अशी की, कोंढवा बुद्रुक व खुर्द (पुणे) येथील आकाश राजू ढवळे ( वय 22), रोहित सोपान लोणकर (वय 24), आदेश महादेव गायकवाड (वय 23, तिघे रा. कोंढवा खुर्द, पुणे) व मृत टिळेकर हे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास भिवरी येथील अमराई पाझर तलावात गेली होती. त्यावेळी टिळेकर तलावाच्या पलीकडच्या बाजूस पोहत जात असताना त्याची दमछाक झाल्यामुळे साधारण सव्वातीनच्या सुमारास तो पाण्यात बुडाला.
त्यानंतर त्याच्या 100 नंबर वरती फोनकरून सासवड पोलीस ठाण्यात संपर्क केला. त्यानंतर सासवडचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माने आणि त्यांच्या पोलीस पथकाने होमगार्ड जवानांसह घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली; परंतु तपास कार्यात अडथळे आल्याने त्यांनी पीएमएआरडीए आणि मुळशी येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क केला.
त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख प्रमोद बलकवडे यांचे पथक घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर त्यांनी शोधकार्य करून मयत स्वप्नील टिळेकरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच पोलिसांनी मृतदेहाची सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह संबंधित नातेवाइकांच्या ताब्यात दिला. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजित माने हे करीत आहेत.