राजगुरूनगर -खेड पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक बुधवारी (दि. 30) होणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; मात्र निवडणूक शांततेत व ठरल्यानुसार होण्याची चिन्हे आहेत.
सभापती अंकुश राक्षे यांनी ठरल्यानुसार सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. पंचवार्षिक निवडणुकीच्या पहिल्या अडीच वर्षात सुभद्रा शिंदे या सभापती होत्या. दुसऱ्या सत्रातील अडीच वर्षांकरिता सभापती पद नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी राखीव झाले.
डिसेंबर 2019 मध्ये शिवसेनेचे अंकुश राक्षे सभापती झाले होते. सदस्यांमध्ये आपापसांत ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण होताच राक्षे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा मंजूर झाल्यानंतर या रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन 30सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता केले आहे.
तिघेजण शर्यतीत, आमदारांच्या भूमिकेकडेही लक्ष
पंचायत समितीत 14 पैकी 8 सदस्य शिवसेनेचे आहेत. सदस्या सुनीता सांडभोर, वैशाली जाधव आणि माजी उपसभापती भगवान पोखरकर यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. शिवसेनेचे प्राबल्य असले तरी सभापतीपदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक असल्याने सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीत विद्यमान आमदार दिलीप मोहिते हे काय भूमिका घेणार हे सुद्धा महत्वाचे असल्याने निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे.