डॉ. थेरो : ‘केलानिया’त शाहू-फुले-आंबेडकर विचार संमेलन उत्साहात
भोर – बुद्ध विचारांची जी जननी आहे त्या भारत देशातील भोर येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाने आमच्या इथे विचार संमेलन घेऊन एक प्रकारे श्रीलंका आणि भोर यांच्यात बुद्ध विचारांचा भविष्यात नवा सेतू उभारला जाईल, असे प्रतिपादन केलानिया विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि पाली विभाग व बुद्धाज् स्टडीज सेंटरचे प्रमुख डॉ. धम्मानंद थेरो यांनी केले.
येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि श्रीलंका येथील केलानिया विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच श्रीलंका येथील केलानिया विद्यापीठात आंतरराष्ट्रीय फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार संमेलन पार पडले, या प्रसंगी ते बोलत होते.
डॉ रुपेश क-हाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात भारत आणि श्रीलंका येथील विचारवंत, अभ्यासक, संशोधक सहभागी झाले होते. डॉ. आर. के. लाल धर्मासिरी (भूगोल विभाग प्रमुख – केलानिया विद्यापीठ), प्रो. वाल्समुल्ली भद्दीया थेरो (पाली आणि बुद्धिस्ट स्टडी सेंटर – केलानिया विद्यापीठ ), प्रो. पान्हादुवे यस्सी थेरो (प्रो. पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज युनिव्हर्सिटी ऑफ श्रीजयवर्धनपुरा), प्रो. सुरीवेवा विजयाविमाला थेरो (पाली विभाग, केलानिया विद्यापीठ),
प्रो. सार्थ चंद्रशेखरा ( एसआयबीए कॅम्पस पल्लेकेले – श्रीलंका), प्रो. अमुनुदोवे हेमसिरी थेरो (केलानिया विद्यापीठ) हे विचारवंत, अभ्यासक श्रीलंका येथून, तर डॉ. नम्रता बागडे ( उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद), प्राचार्य सुरेश खराते (सातारा ), डॉ. गोल्डी क-हाडे ( संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती), प्रा. सुरेखा खरे (वाडिया महाविद्यालय, पुणे) हे भारतातून सहभागी झाले होते.
पुढील काळात केलानिया विद्यापीठ आणि फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी बुद्ध विचार महोत्सवाचे आयोजन श्रीलंकेत केले जाईल, याची घोषणा डॉ. उदिता गुरुसिन्हा यांनी केली. याचा करार ऑनलान पद्धतीने लवकरच केला जाणार असल्याचे प्रा. डॉ. रोहिदास जाधव यांनी सांगितले. विचार संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. सुलभा पाटोळे यांनी केले. प्राचार्य डॉ. विजया भालेराव यांनी आभार मानले.