सरपंचपदी पोखरकर : आई मळुदेवी पॅनलचे वर्चस्व
राजगुरूनगर – खेडच्या पश्चिम भागात राजकारणात अग्रभागी असलेल्या वाळद ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी श्री आई मळुदेवी ग्रामविकास पॅनेलचे मनोहर बबन पोखरकर हे भरघोस मतांनी निवडून आले. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे यांचा पराभव केला. आई मळुदेवी पॅनेलने सरपंचपदासह सदस्यांच्या पाच जागा जिंकत ग्रामपंचातीवर वर्चस्व प्रस्थापित केले.
तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींपैकी जिल्ह्याचे लक्ष लागलेली वाळद ग्रामपंचायतीची निवडणूक होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक तथा जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर आणि भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे यांचे हे गाव तर उद्योजक क्षेत्रात वाळद गावाची सर्वत्र चर्चा असते.
यात जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांचा श्री आई मळुदेवी ग्रामविकास पॅनेल तर भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे यांनी श्री मळुदेवी विकास क्रांती पॅनेल उभा केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुधाकर महांकाळ यांनी काम पहिले. सरपंचपदासाठी मनोहर पोखरकर 616 मते पडली तर विरोध सचिन लांडगे यांचा 514 मते मिळाल्याने त्यांचा 102 मतांनी पराभव झाला.
निवडणुकीपुरते राजकारण झाले असले तरी गावाच्या विकासाठी आम्ही सर्व एकजुटीने काम करू.शासनाच्या विविध योजना आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळवून देऊ. आदर्श ग्रामपंचायत म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक होईल, असे सर्वाना बरोबर घेऊन काम करू.- मनोहर पोखरकर, नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच.