टोमॅटो, सिमला मिरचीची मुबलक आवक
पुणे – मार्केट यार्डात मागील 4 दिवसांपासून सिमला मिरची आणि टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. राज्याच्या विविध भागांतून ही आवक होत आहे. दिवाळीमुळे खानावळी बंद होत आहेत. तसेच घरगुती ग्राहकांकडून मागणी कमी आहे. कित्येक गाळ्यांवर मागणी अभावी माल शिल्लक राहत आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे.
सध्या घाऊक बाजारात सिमला मिरची आणि टोमॅटोला अनुक्रमे किलोस दर्जानुसार 6 ते 12 रुपये आणि 10 ते 12 रुपये भाव मिळत आहे. येथील तरकारी विभागात मंगळवारी (दि. 7) राज्यभरातून सिमला मिरचीची 50 ते 60 टन, तर पुणे विभागातून टोमॅटोची 100 ते 120 टनाची आवक झाली.
सिमला मिरच्या आणि टोमॅटोला मिळणाऱ्या भावातून शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. सद्य:स्थितीत दिवाळी सणाचे वातावरण आहे. त्यामुळे फळभाज्यांना ग्राहकांकडून मागणी घटली आहे. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्याने ते आपापल्या गावाकडे गेले आहेत.
तर शहरातील नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे खानावळी आणि हॉटेल चालकांकडूनही भाज्यांना होणारी मागणी घटली आहे. दिवाळी सण संपेपर्यंत ग्राहकांकडून भाज्यांना मागणी कमीच असणार आहे. त्यामुळे 8 ते 10 दिवस भाज्यांच्या मागणीत वाढ होणार नसल्याने भावही वाढणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.