पुणे/पिंपरी – वाढत्या धूलिकणांमुळे देशभरातील मोठ्या शहरांमध्ये हवा प्रदूषणाने अतिधोकादायक पातळी गाठली आहे. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे वाढते प्रदूषण लक्षात घेऊन शहरांमध्ये सुरू असलेली बांधकामे आणि उड्डाणपूल तसेच मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी धोकादायक धूलिकण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाने जाहीर केल्या आहेत.
या सूचनांची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतही अंमलबजावणी केली जाणार आहे. यात सध्या सुरू असलेली बांधकामे, पाडण्यात येत असलेली बांधकामे तसेच प्रकल्पांच्या कामावर ओले हिरवे कापड, ओले ज्यूट कापड अथवा ताडपत्रीने झाकणे बंधनकारक करण्यात आले. याबाबतच्या सूचना बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येणार असून त्याची तातडीने अंलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
दरम्यान, याबाबत आदेश काढण्यात आल्यानंतर या उपाययोजना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्या जाणार असून त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्यास ही बांधकामे थांबविणे अथवा सील केली जाणार आहेत.
असे असतील नियम
- 50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या तसेच 1 एकरपेक्षा अधिक जागेतील प्रकल्पाभोवती 25 फूट उंचीचे पत्रे बसविण्यात यावे.
- बांधकाम सुरू असलेली जागा ताडपत्री, ओल्या हिरव्या कापडाने, ओल्या ज्युट शिटने झाकावी.
- बांधकाम कामगारांना मास्क, गॉगल बंधनकारक करावा; बांधकामाच्या ठिकाणी माती, खडी, वाळू झाकून ठेवावी.
- उड्डाणपूल यांसारख्या सर्व कामांच्या ठिकाणी किमान 20 फूट बॅरिकेडिंग असावे; राडारोडा टाकल्यास वाहने जप्त करणार
- धूलिकण रोखण्यासाठी स्मॉग गन वॉटर स्प्रिंकलरचा वापर बांधकामाच्या वेळी करावा.