गोहेतील 11 मुलींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील 5 शासकीय आश्रमशाळेतील 70-80 मुले संसर्ग आजाराने ग्रासले आहेत. यातील गोहे शासकीय आश्रमशाळेत 31 मुले ग्रासली होती. त्यात 11 मुलींना अधिक त्रास होऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एकाच वेळी जास्त मुले आजारल्याने गोहे आश्रम शाळेला 5 दिवस सुट्टी डॉक्टरांच्या सुचनेमुळे शाळा प्रशासनाने दिली आहे.
गोहे, तेंरुगण, राजपूर, आसाणे व आहुपे येथील 70 ते 80 मुले थंडी, ताप व अंगदुखी आजाराने ग्रासले आहेत. यातील गोहे आश्रमशाळेतील 11 मुलींना थंडी, ताप, अंगदुखी व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे (दि. 4) दुपारी उपचारासाठी दाखल केले. दरम्यान पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात मुलींची विचारपूस करून रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांशी याबाबत चर्चा केली.
याबरोबरच आश्रमशाळेतील मुलांची आरोग्य तपासणी व आजारी मुलांनवर ताबडतोब उपचार करावे अशी सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आश्रमशाळेत 1 ली ते 12 वी 150 मुले आणि 200 मुली निवासी आहेत, तर 100 मुले स्थानिक आहेत. पाच दिवस शाळा बंद ठेवण्याच्या सुचना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिली आहे.
अशुद्ध पाणीपुरवठा
गोहे आश्रमशाळेत मुलांना आंघोळीसाठी पाणी नाही. पिण्यासाठी अशुध्द पाणी आहे. पाण्याचे फिल्टर बंद आहेत. 23 आश्रमशाळेत ही स्थिती असल्याने अशुध्द पाणीच मुले पितात. मुलांची आरोग्य तपासणी होत नाही. आजारी झाल्यावरच सरकारी दवाखान्यात नेले जाते.