उपचारअंती सर्व रुग्ण बरे जनजागृतीमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण झाले कमी
एप्रिल 2021 ते मार्च 2022च्या कार्यकाळातील घटना
रामदास सांगळे
बेल्हे – पावसाळ्यात ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने सापाच्या बिळामध्ये पाणी जाऊन साप बाहेर येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत जुन्नर तालुक्यात 175 जणांना सर्पदंश झाला आहे असून, सर्व उपचारानंतर बरे झाले आहेत.
तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे अंतर्गत येणाऱ्या गावांतील सर्वाधिक 46 लोकांना सर्पदंश झाला तर त्या खालोखाल ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील 44 नागरिकांना सर्पदंश झाला तर निमगाव सावा व राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकही नागरिकांना वर्षभरात सर्पदंश झाला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. उल्टी होणे, चक्कर येणे, थंडी, चिकट त्वचा ही लक्षणे सर्पदंशाची आहेत.
जुन्नर तालुका डोंगराळ असून उर्वरित प्रदेशात धरणांमुळे बागायती क्षेत्र वाढलेले आहे त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. सर्पदंश प्रामुख्याने शेतकरी आदिवासी कुटुंबातील शेतमजूर (20 ते 40 वयोगटातील) तरुणांना, महिला व मुलांना होतो. जनजागृतीमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण कमी झाले असून स्थानिक पातळीवर अत्याधुनिक उपचार मिळाल्यामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णांना जीवदान मिळत आहे.
अशी घ्यावी काळजी
सर्पदंश सहसा रात्री होतो, म्हणून जून ते ऑक्टोबर दरम्यान जमिनीवर झोपणे टाळा, घराच्या व कुंपणाच्या भीतीचे तडे बुजवा, ड्रेनेज पाइपला बारीक जाळ्या बसवावे, घराजवळ पाचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड विटांचे ढीग, लाकडाचा साठा करू नये, घराजवळ खिडकी दरवाजाना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे, सरपण गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनीपासून उंचीवर ठेवा, चालताना पायात बूट असावे, शेतात काम करताना गवतात एकदम हात घालू नका, जिथे काम करायचे तिथे आधी मातीचे लहान ढेकळे फेकून, तसेच काठी जमिनीवर आपटून काम सुरू करावे, अंधारात जाताना नेहमी हातात टॉर्च बाळगावी.
साप घरात अथवा बाहेर असला तरी घाबरू नका, शांत राहा, सापाला न मारता आपल्या माहितीतील जाणकार सर्पमित्राला बोलवा. स्वतः साप पकडू नका. सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवा, लहान मुले, पाळीव प्राण्यांना सापापासून दूर ठेवा. सापाजवळ जाण्याचा व फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका. त्याला पकडण्यासाठी टोपली, बादली, किंवा इतर कापड त्याच्यावर झाकू नये.
– आकाश माळी, सर्पमित्र
सर्पदंश झाल्यावर प्रथम उपचार म्हणून रुंद क्रेप बॅडेज दंश झालेल्या अवयवास बांधावे. बॅडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे 4 इंच रुंदीचे पट्टे वापरावेत. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा. त्यासाठी बॅडेज बांधताना फळीचा आधार द्यावा. दोरीने करकचून बांधू नये. त्यामुळे गॅंग्रीन होण्याची शक्यता असते. वैद्यकीय तपासण्या व उपचार लक्षणांवरून कोणता साप चावला आहे हे ओळखता येते.
– डॉ. सदानंद राऊत, सर्परोग तज्ज्ञ, नारायणगाव