१ जानेवारी रात्री १२ पर्यंत कार्यवाही
लोणीकंद – कोरेगाव भीमाजवळ पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड शहराकडून, नगर रोडवरुन अहमदनगरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांनी (पेरणेफाटा विजयस्तंभाकडे जाणारी वाहने वगळून) दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोनपासून (आवश्यकतेनुसार) ते १ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा व प्रवाशांनी, वाहनचालकांनी सहकार्य करावे असं आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे.
पुणे बाजूकडून नगर बाजूकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी, खराडी बायपास येथून उजवीकडे वळण घेवून मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळण घेवून पुर्ण सोलापूर हायवेने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगररोड असे जावे. सोलापूर रोडवरुन आळंदी, चाकण याभागात जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर, मगरपट्टा चौक, उजवीकडे वळण घेवून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जावे. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहमदनगर अशी जातील.
मुंबई येथून नगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगर अशी जातील.
कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर येथून पुणे सोलापूर हायवेने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे. (विजयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून)
इंद्रायणी नदीवरील आळंदी तुळापूर हा पुल १० जानेवारी २०२२ रोजी जड वाहनांनाकरीता बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण- शिक्रापूर रोडचा वापर करावा.