राजगुरूनगर – कुरुळी (ता. खेड) येथे सात वर्षांच्या लहान मुलीवर बलात्कार करणार्या नरधमास खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरेंद्र कैलास वर्मा (वय 22 रा. कुरुळी ता. खेड, मुळगाव कंपू, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. दि 7 जुलै 2015 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजण्यापूर्वी कुरुळी येथे ही वाईट घटना घडली होती.
हा खटला राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायालयातील न्यायाधीश एस पी पोळ यांच्या पुढे सुरु होता. या खटल्यात आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी 8 साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, डॉक्टर, फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला.
न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी आरोपी सुरेंद्रला भादंवि कलम363 अन्वये 5 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड दंड न भरल्यास 3 महिने साधा कैद, भादंवि कलम 376 अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड दंड न भरल्यास 3 महिने साधा कैद, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 चे कलम 6 अन्वये 12 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम रुपये 20 हजार पीडित मुलीचा देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्याचे न्यायालयीन पोलीस कामकाज योगिता गावडे यांनी केले.