अकोले – अकोले तालुक्यातील अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने जाहीर लिलाव विक्रीतून संस्थेची १ कोटी ५५ लाखांची थकित कर्ज वसुली केली आहे. अगस्ती पतसंस्थेची काही थकित कर्जदारांनी कर्ज न भरल्याने संस्थेकडे तारण असलेल्या जमिनीवर संस्थेचा मालकी म्हणून नोंद झाल्यानंतर पतसंस्थेला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, अकोले यांचेकडून वसुली दाखला मिळाला होता. त्यानंतर दि. ६ ऑक्टोबर रोजी जिल्हा उपनिबंधक यांचेकडून कलम १०० व नियम ८५ अन्वये संस्थेच्या नावे हस्तांतरीत झालेल्या स्थावर मिळकतीची अपसेट प्राईज ठरवून विक्री करण्याची परवानी मिळणेबाबत प्रस्ताव संस्थेने तयार करुन तो दाखल केला. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी संस्थेला अपसेट प्राईज ठरवून विक्री करण्याची परवानगी मिळाली.
संस्थेने हस्तांतरीत मिळकतीचा जाहीर लिलाव दि. २२ नोव्हेंबर रोजी केला. तांभोळ येथील , गट नंबर- ६८/२ क्षे.०.५० आर, गट नंबर- ६८/३ क्षे.०.५० आर, ६८/४ क्षे. १.२० आर, क्षे. ६८/५ क्षे. ०.४० अशी २६० गुंठे म्हणजे ६.५० एकर क्षेत्राचा लिलाव करण्यात आला.
यावेळी वसुली अधिकारी शेख, काळे तसेच संस्थेचे चेअरमन अशोकराव देशमुख, संचालक मारुती भिंगारे, शिवराम भोर, शिवाजी गोंदके, गणेश पापळ, प्रमोद मंडलिक, दत्तात्रय धुमाळ, गुलाब आरोटे, सुरेखा नाईकवाडी, अनिल कोळपकर, सुरेश देशमुख, नीलेश गायकर, कार्यकारी संचालक दिलीप उदमले आदींच्या उपस्थित संस्थेच्या हॉलमध्ये करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेत बाबासाहेब दातखिळे, शांताराम हासे, वसंत धुमाळ. केशव नवले, संजय नवले, रमेश आरोटे यांनी सहभाग घेतला. तीन फेऱ्यात झालेल्या या लिलावात १ कोटी ५५ लाखांची संस्थेची कर्ज वसुली झाली आहे.