मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्याकडील पाठपुराव्यास यश
मंचर – शिरूर लोकसभा मतदार संघातील गावागावातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडील पाठपुराव्याला यश येऊन 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते शिरूर लोकसभा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या इतर ग्रामीण विकास 2515 कार्यक्रमाअंतर्गत या कामांना मंजुरी मिळाली आहे. या निधीसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री यांनी तात्काळ राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व प्रधान सचिव यांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार आंबेगाव तालुका 3 कोटी 80 लक्ष, खेड तालुका 2 कोटी 30 लक्ष, शिरूर-हवेली विधानसभा 2 कोटी 40 लक्ष, जुन्नर तालुका 1 कोटी 60 लक्ष, अशी शिरूर लोकसभेतील 98 गावांना मिळून 10 कोटींची विकासकामे मंजूर झाली आहेत. या निधीच्या माध्यमातून गावागावातील अंतर्गत रस्ते, समाज मंदिरे, ग्रामपंचायत इमारत, बहुउद्देशीय सभागृहे, संरक्षक भिंत, भक्तनिवास, महिला अस्मिता भवन, सभामंडपे, पत्राशेड आदी महत्वपूर्ण कामे पूर्णत्वास येणार आहेत.
जनता दरबारामध्ये व गावभेट दौर्यांच्या माध्यमातून मतदार संघातील सरपंच, ग्रामस्थ गावातील कामांना निधी मिळावा. यासाठी माझ्याकडे मागणी करतात. या निधीच्या माध्यमातून गावांतील विकासाचा अनुशेष दूर होणार आहे. इथल्या लोकांचा माझ्यावर विश्वास असून त्याच बळावर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाभिमुख भूमिका निभावण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो. या 10 कोटींच्या विकासकामांमुळे शेकडो गावातील छोटी-मोठी महत्वाची कामे पूर्ण होतील, याचे मनापासून समाधान वाटते, असे यावेळी आढळराव पाटील यांनी सांगितले.