पिंपरी – केंद्र शासन पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा चे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. या विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजना पोहोचतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे, उल्हास जगताप, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, उप आयुक्त अजय चारठणकर, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी महिला बचत गटाद्वारे लागलेल्या स्टॉलची पाहणीही केली. यावेळी उपस्थितांनी सर्व कर्तव्यांचे पालन करू अशी शपथ घेतली.शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
असा आहे वाहन यात्रेचा मार्ग
विकसित भारत संकल्प यात्रेचे वाहन उद्या 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता शिवशंभो उद्यान,संभाजीनगर येथे जाणार असून दुपारी 3 वाजता ते विरंगुळा केंद्र,मोरवाडी या परिसरात असणार आहे.तर 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता आकुर्डी हॉस्पीटल येथे तर दुपारी 3 वाजता आकुर्डीतील महात्मा जोतीराव फुले प्राथमिक शाळेच्या परिसरात असणार आहे.