पुणे – गणेशोत्सव काळात निकृष्ट, अस्वच्छ मोबाइल टॉयलेट पुरवण्यात आले. यानंतर पालिकेच्या नियोजनावर टीकेची झोड उठली आहे. असे असताना पालिकेने पुढील वर्षाच्या गणेशोत्सवासह मोबाइल टॉयलेट पुरवण्यासाठी तब्बल 24 लाख 99 हजार 200 रुपयांची निविदा काढली आहे. ठराविक ठेकेदाराला हे काम देण्यासाठी इतर ठेकेदारांनी ही निविदा भरू नये म्हणून एका बड्या नेत्याचे नाव पुढे करत “इतर ठेकेदारांना निविदा भरू नयेत’ असा इशारा पालिकेतील कर्मचारीच देत आहेत.
ही निविदा दि. 7 ऑक्टोबर रोजी काढली असून, ती भरण्याची अंतिम मुदत दि. 14 ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एवढी घाई कोणासाठी? असा सवालही उपस्थित केला जात आहे. यंदा गणेशोत्सवात शहरात मोबाइल टॉलयेट लावले होते. मात्र, यातील अनेक टॉयलेट स्वच्छ नव्हती. त्याला दरवाजे नव्हते, कड्यादेखील नव्हत्या. त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली. काही भागांत टॉयलेटबाहेर पाण्याचे ड्रम ठेवण्यात आले. या प्रकारामुळे या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. पालिकेकडून अहवाल मागवून याची तपासणी सुरू आहे.
तर, दुसऱ्या बाजूला गणेशोत्सव दोन आठवडे झालेला नसताही लगेच पुढील वर्षभर मोबाइल टॉयलेट पुरवण्याची निविदा काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 25 लाखांपर्यंत विभाग प्रमुख निविदा मंजुरीचे अधिकार असल्याने 24 लाख 99 हजार 200 रुपयांच्या निविदा काढत वरिष्ठांकडे ही मंजुरीसाठी जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
महापालिका निरुत्तर
या प्रकरणी घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख संदीप कदम म्हणाले, संबंधित अभियंत्याकडून खुलासा मागवला आहे. निविदा पुढच्या वर्षभरासाठी असेल असेही ते म्हणाले. मात्र, गणेशोत्सवात 44 लाख रु., तर पालखीवेळेही टॉयलेटवर 15 लाखांचा खर्च झालेला आहे. असे आताना या दोन उत्सवांसाठीच मोबाइल टॉयलेटवर 50 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असताना 25 लाखांत हे काम कसे होणार? याबाबत त्यांना उत्तर देता आले नाही.