पुणे – स्वराज्याचे प्रणेते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शहरात दारू विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी शहरात शिवजयंती उत्सव साजरी करणाऱ्या मंडळांतर्फे महापालिका, तसेच पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली. याशिवाय या मिरवणुकीत स्पीकर्सच्या भिंतींऐवजी पारंपरिक वाद्यांचाच वापर करण्यात यावा, अशी मागणीही काही कार्यकर्त्यांनी करत यावेळी अभिनव पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याची विनंती प्रशासन, तसेच इतर मंडळांना केले आहे.
शिवजयंतीनिमित्त महापालिकेतर्फे आयोजित पालिका, पोलीस व शिवजयंती उत्सव कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप, पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रभारी नगरसचिव योगिता भोसले-निकम आदींसह पोलीस व पालिका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत महापालिकेच्या वतीने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल. शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा घेतल्या जातील. त्याचबरोबर शहरात विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी उपस्थित शिवप्रेमींना दिले. तर
मंडळांनी नियमांचे पालन करून उत्साहात शिवजयंती साजरी करावी. पोलिसांनाही त्यात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त गिल यांनी केले.