तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव सार्वजनिक गणेश मंडळाकडून शिवप्रतिमांची पूजा करून तर श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीकडून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहाने साजरा करण्यात आला.
ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीतर्फे श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील व उत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन काकडे यांच्या हस्ते शिवरायांची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
श्री डोळसनाथ महाराज मंदिरापासून निघालेली भव्य मिरवणूक गणपती चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक येथून शाळा चौकामध्ये तिचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीमध्ये महाराजांच्या मूर्तीची सजावट तसेच जिवंत देखाव्यांचा समावेश होता. त्यात गोहत्या, स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, पारंपरिक वाद्य, ढोल, लेझीम, मर्दानी खेळ, बँड आणि डीजे यांचा सहभाग होता.
या वेळी अध्यक्ष मिथुन काकडे, खजिनदार प्रणव दाभाडे, सरचिटणीस सुधीर सरोदे, प्रसिद्धी प्रमुख स्मितेश भेगडे, कार्याध्यक्ष स्वप्नील दाभाडे, उपाध्यक्ष गौरव परदेशी, खजिनदार अमर जगदाळे, रोहित करपे, तळेगाव दाभाडेमधील सर्व मंडळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्य सहभागी झाले होते.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तळेगाव दाभाडे परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांतील तरुणांनी महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यावरून शिवज्योत आणून मंडळामध्ये सामुदायिक आरती केली.