Mla Ganpat Gaikwad : मुंबईच्या उल्हासनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपली प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले.
आमदार गणपत गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया देताना,”माझ्या मुलाच्या अंगावर महेश गायकवाड धावून आले. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. म्हणूनच मी गोळीबार केला”, असे आमदार गायकवाड यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, “जर माझ्या नजरेसमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी मी गोळीबार केला. मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही”, असेही आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे पिता-पुत्रांवर देखील गंभीर आरोप केले. कल्याण पूर्वेत शिंदे बापलेक माझ्यावर अन्याय करत राहिले. माझे करोडो रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांनी ते परत केले नाहीत. दुसरीकडे मी केलेल्या कामांचे क्रेडिट खासदार श्रीकांत शिंदे घेत होते. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा डाव शिंदेंनी आखला होता, असे गायकवाड म्हणाले.