केवळ 14 जूनला बंद राहणार मंदिर
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.14) शिळा मंदिर आणि तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून तुकोबांचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय देहू संस्थानने घेतला होता. मात्र, समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया आणि भाविकांची होणारी गैरसोय यामुळे हा निर्णय बदलण्यात आला असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.
येत्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचे मंगळवारी (दि.14) उद्घाटन होणार आहे. त्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच याठिकाणी पंतप्रधान मोदी यांची जाहिर सभादेखील होणार असल्याने तीन दिवस संत तुकाराम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. शनिवारी देहूतील तुकोबांचे मंदिर भाविकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितले होते. परंतु, या निर्णयानंतर समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया आणि भाविकांची होणारी गैरसोय यामुळे हा निर्णय
बदलण्यात आला असल्याची माहिती नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. हा निर्णय मागे घेत, केवळ कार्यक्रमादिवशी म्हणजे 14 जूनला सायंकाळी पाचपर्यंत मंदिरात भाविकांना बंदी असणार आहे.
सध्या आषाढीवारीसाठी काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर आषाढीवारी भरत असल्याने राज्यभरातून तुकोबांच्या दर्शनासाठी भाविक येत आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दर दोन तासांनी दर्शन थांबविण्यात येणार आहे. परंतु, त्या वेळेत आलेल्या भाविकांना स्क्रिनच्या माध्यमातून मुखदर्शन घेता येईल, याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बॉम्बनाशक पथकाकडून तपासणी
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणेने देहूत तळ ठोकला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर व परिसराची तपासणी करण्यात येत आहे. तसेच बॉम्बनाशक पथकाकडून परिसरात श्वानपथकाकडून तपासणी केली जात आहे.