पुणे – बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला तपासासाठी मगरपट्टा येथे पोलीस चौकीत घेऊन गेले. तेथून तो पोलिसांना धक्का देऊन पळाल्याची घटना सोमवारी (दि. 4) संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान घडली.
प्रीतम चंदुलाल ओसवाल (वय 32 , रा- देवाची उरुळी) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. आरोपी प्रीतम ओसवाल आणि फिर्यादी महिलेची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यावेळी ओसवाल याने फिर्यादीला कोर्ट केसमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक निर्माण केली.
त्यानंतर फिर्यादींचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याच्या धमकीने त्यांच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती.
दरम्यान सोमवारी त्याला तपासाच्या कामासाठी मगरपट्टा पोलीस चौकी येथे नेण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांना धक्का देऊन तो पळाला. याची माहिती मिळताच पथके त्याच्या तपासासाठी रवाना करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.