पुणे – दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेल्या गुन्हेगाराचा पाठलाग करताना गुन्हेगाराने पोलिस पथकावर पिस्तूलातून गोळी झाडली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गुन्हेगारावर तीन राऊंड फायर केले. यानंतर त्याच्या दुचकीला गाडी आडवी घालून त्याला साथीदारासह जेरबंद केले. हा थरार एनडीए परिसरातील मुठा रस्त्यावर मंगळवारी दुपारी घडला. ( criminal fired on the police team)
नवनाथ निलेश वाडकर (१८ रा.जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. केतन साळुंखे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पत्रकारावरील हल्यातील गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नवनाथ वाडकर हा सराईत गुन्हेगार आहे. तो सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देत नवनाथने पळ काढला होता. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तेव्हापासून खंडणी विरोधी पथक त्याच्या मागावर होते. तो मुठा परिसरात पिस्तूल घेऊन आला असल्याची खबर खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण यांचे पथक दोन कारमधून त्याच्या मागावर गेले.
एनडीए रस्ता येथे दुचाकीवरुन साथीदारासह जाताना तो दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केल्यावर त्याने पोलिसांवर पिस्तूलातून गोळी झाडली. मात्र सुदैवाने ती कोणाला लागली नाही. त्याला प्रत्युत्तदरादाखल पोलिसांनी त्याच्यावर तीन राऊंड झाडले. यानंतर गाडी त्याच्या दुचाकीला आडवी घालून दोघांनाही ताब्यात घेतले.
पर्वतीतील गँगवारचा भाग –
पर्वतीमध्ये निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या अशा दोन टोळ्या कार्यरत होत्या. वर्चस्ववादातून दोन्ही गँगमध्ये अनेकदा भडका उडत होता. दरम्यान चॉकलेट सुन्याच्या टोळीने २०१८ मध्ये निलेश वाडकर याचा पर्वती पायथा येथे निर्घुन खुन केला. यामध्ये चॉकलेट सुन्यासह २२ जणांना अटक करण्यात आली. नंतर चॉकलेट सुन्या गँगला मोक्काही लागला.
दरम्यान तेव्हा निलेश वाडकरचा मुलगा नवनाथ हा अल्पवयीन होता. वडिलांच्या निर्घुन खुनाचा बदला घेण्याची आग तेव्हा पासून त्याच्या मनात धगधगत होती. दरम्यान वाडकर गँगमधील काही सदस्यांनी चॉकलेट सुन्याच्या भावाचा खून केला. तर नवनाथने अल्पवयीन असतानाच दोन जणांच्या खूनाचा प्रयत्न केला. नवनाथवर अल्पवयीन असताना पासून तब्बल आठ गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान नवनाथने दोन महिण्यापुर्वीच १८ वर्षे पुर्ण केली. तर दुसरीकडे चॉकलेट सुन्यासह चौघे निलेश वाडकरच्या खुनाच्या गुन्हयातून नुकतेच जामिनावर बाहेर आले. ही माहिती नवनाथला मिळताच त्याने हत्याराची जुळवा जुळव केली. बदला घेण्याची संधी नवनाथ शोधत असतानाच दुसरीकडे खंडणी विरोधी पथकही त्याच्या मागावर होते.
दरम्यान, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांच्या पथकावर यापुर्वीही आरोपींकडून हल्ला झाला होता. व्यवसायीकाला पाच कोटीची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला पाटस येथे पकडण्यासाठी गेल्यावर त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये चव्हाण आणि अंमलदार सुरेंद्र जगदाळे जखमी झाले होते.