बीजिंग – तैवानमध्ये हाइकू वादळामुळे सार्वजनिक जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुले अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली असून मालवाहकूक करणाऱ्या बोटींची सेवाही स्थगित केली गेली आहे. वादळापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तैवानच्या बहुतेक भागांमध्ये अजूनही हाइकू वादळाचा परिणाम जाणवतो आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या डझनभर विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चीनचे अधिकार क्षेत्र असलेल्या हॉंदकॉंग आणि मकाऊ बेटांवर जाणारी विमानसेवाही विस्कळीत झाली आहे. हाइकू वादळाच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 137 किमी इतका होता, असे तैवानच्या हवामान विभागाने म्हटले आहे.
वादळामुळे मध्य तैचुंग प्रांतातील हॉट एअर बलूनचा महोत्सव, एक कला महोत्सव आणि बेसबॉलची स्पर्धा देखील देखील रद्द करण्यात आली. हाइकू वादळ तैवानमधून बाहेर पडल्यानंतर चीनमध्ये जाण्याचा अंदाज आहे. चीनमध्ये नुकत्याच आलेल्या साओला वादळामुळे गेल्या शुक्रवारपासून सार्वजनिक जनजीवनावर परिणाम झाला आहे.
शाळा पुन्हा सुरू करण्याचे वाळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. हॉंगकॉंगच्या शेअर बाजाराचे व्यवहार देखील शुक्रवारी स्थगित ठेवण्यात आले. देशभरातील 460 विमानांची उड्डाणे रद्द केली गेल्यामुळे हजारो लोक विमानतळांवरच अडकून पडले आहेत. हॉंगकॉंग आणि मकाऊला जोडणाऱ्या पूलावरील वाहतूक स्थगित केली गेली. झुहाइ येथील उत्पादन उद्योग आणि मकाऊ येथील कसिनो देखील बंद ठेवण्यात आले आहेत.
चीनमधील साओला वादळाची तीव्रता झाली कमी
हाइकू वादळाची तीव्रता वाढत असतानाच चीनमधील साओला वादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. या वादळामुळे 9 लाख लोकांना आणि 80 हजार मासेमारी बोटींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हे सर्वजण हॉंगकॉंग किंवा समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशातील आहेत.
किनारपट्टीच्या भागातील बहुतेक उद्योग, शाळा आणि परिवहन उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. खबरदारी घेतल्यामुळे साओला वादळामुळे झालेले नुकसान फारच कमी आहे. त्यामुळे रविवारी बहुतेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. वादळामुळे देण्यात आलेला 10 क्रमांकाचा इशारा शनिवारी रात्री मागे घेण्यात आला.