पुणे – शहरात मागिल काही दिवसांत फेसबुक व इतर सोशल मिडियावर गल्ली बोळातील तथाकथीत भाई लोक शस्त्र घेऊन स्टेटस ठेवत आहेत. तर मुळशी पॅटर्न चित्रपटानंतर तलवारीने केक कापायचे` फॅड निर्माण झाले आहे. हे भाईलोक सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार करत दहशत माजवत आहेत.
कोयता भाई ऊर्फ यम भाईने कोयता हातात घेऊन छक्या-पंजांचं ऐकून कुत्रीही चालतात, पण आमची सूत्रं येरवडा जेलमधून हलतात, अशा आशयाचा व्हिडिओ शेअर केले जात आहेत. हे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येताच पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला. पोलिस आता प्रत्येक गुन्हेगार व संशयीत गुन्हेगाराच्या मोबाईलमधील स्टेटस तपासत आहेत. शस्त्रासह भाईगिरी करणारे स्टेटस दिसल्यास त्यास ताब्यात घेऊन पुणे पोलिसांचा पॅटर्न दाखवला जात आहे.
कात्रज किंगला पोलिसांनी दाखवला कात्रजचा घाट
कात्रज किंग… सगळ्याचा बाप… पोलीस आयेगी बत्ती लगाकर तो बोलने का माया भाई आया था असे फिल्मी स्टाईल स्टेट्स टाकून कात्रज परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यास अटक करण्यात आली. अतुल सुरज थोरात कात्रज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील काही युवक हातात तलवारी घेऊन फेसबुक स्टोरी टाकत दहशत निर्माण करत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई चा धडका लावला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील अधिकारी नितीन शिंदे पेट्रोलिंग करत असताना कात्रज गावातील एकाजण सोशल मीडियावरील हॉंटस अँप वर तलवारीसह फोटो टाकून दहशत करत होता, तो तलवारीसह कात्रज स्मशानभूमीजवळ उभा असल्याची माहिती पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांना मिळाली. त्यानूसार तपास पथकाने थोरात यास जवळ जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला. मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या जवळ एक लोखंडी तलवार मिळून आली. अंमलदार विक्रम सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थोरात याच्यावर आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रवींद्र चिप्पा करत आहेत. ही कारवाई अंमलदार रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा, योगेश सुळ, गणेश शेंडे, राहुल तांबे सचिन गाडे, आशिष गायकवाड आणी विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.
भाईका बड्डे : पण पोलिसांनीच वाजवले बारा –
गुन्हे शाखा युनिट 1 कडील पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदारइम्रान शेख व तुषार माळवदकर यांना त्याचे खबर मिळाली की अजिंक्य राजगुरु(27,रा.येरवडा) याने त्याचा वाढदिवस साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी त्याचे हातातील तलवारीने केक कापला आहे व ते फोटो फेसबुक या सोशल मिडियावर टाकले आहेत. तसेच तो आता तलवार घेवुन आझाद आळी,गावठाण येरवडा पुणे परिसरात फिरत आहे.
खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी आझादनगर येरवडा पुणे या भागात सापळा रचून राजगुरु यास तलवारीसह ताब्यात घेतले आहे. त्याचे ताब्यातुन 38 इंच लांब दुधारी पाते व नक्षीदार मुठ असलेली तलवार हस्तगत करण्यात आलेली आहे. त्यास पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन पुणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. आरोपी याचे विरुध्द सन 2016 मध्ये कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे येथे बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा, मारामारी, दुखापत केल्याबाबत एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने केली.