औरंगाबाद – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रही सुरु केलं होतं. मात्र पंकजा यांनी सर्वांना राजीनामे परत घेण्याची सूचना केली. तसेच आपण नाराज नसल्याचे म्हटलं होतं. आता पंकजा यांच्या नाराजीवरून माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना पकंजा यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला आहे.
महादेव जानकर सध्या मराठवाड्यात आहेत. औरंगाबादमध्ये बोलत असताना ते म्हणाले की, पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. तिच्यावर काही अन्याय झाला असेल तर माझ्या बहिणीनं मला सांगावं मग बघू, असा इशाराच महादेव जानकर यांनी दिला आहे.
दरम्यान राष्ट्रीय समाज पक्ष हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा जानकर यांनी केली.
यावेळी जानकर यांनी वॉटरग्रीडवर आपलं मत मांडलं. मराठवाड्याचं वॉटर ग्रीड भगवानगडावर व्हावं. असं झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असं जानकर यांनी म्हटलं. दरम्यान ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्वत: या कमिटीचं प्रमुख व्हावं आणि ओबीसींचा डेटा तयार करावा, अशी मागणीही जानकर यांनी केली आहे.