पुणे : पुण्यातील शुक्रवार पेठेत सोमवारी सकाळी थरारक घटना घडली. येथील गणेश अपार्टमेंटमध्ये एका रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी चौथ्या मजल्याच्या खिडकीबाहेर अडकलेल्या १४ वर्षीय मुलीची सुखरुप सुटका केली. हा थरार येथे उपस्थितांनी अनुभवला. अग्निशमन दलाने केलेल्या कामगिरीनंतर येथील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन केलं.
एक मुलगी क्रेनला अडकली असल्याचा फोन कॉल अग्निशमन दलाला सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी करण्यात आला होता. त्यानंतर ५ मिनिटांत अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी येथे एक मुलगी चौथ्या मजल्यावर एका खिडकीच्या ग्रीलला पाय देऊन उभी होती. तिने साडीला धरुन ठेवलं होतं. मुलगी टेरेसवरुन पाय घसरुन पडल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.
मुलीचा हात सुटल्यास ती कधीही खाली पडली असती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने खाली जाळीचे नेट धरुन ठेवले. त्यानंतर काही जवानांनी वरच्या मजल्यावर जाऊन मुलीकडे दोरी टाकली. तर काही कर्मचाऱ्यांनी शिडी लावून मुलीला खाली आणले.
अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, जवान राहुल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकुळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे, वाहनचालक राजू शेलार यांचा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग होता.