पुणे – नऱ्हे येथील एका उद्योजकाला महामार्गावर आडवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी व्हॉटसअप कॉल करून 50 लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तुझ्या जीवाची किंमत 50 लाख आहे, दोन डेमो झाले आता तीसरा मोठा डेमो दाखवतो, असे म्हणत धमकावण्यात आले. याप्रकरणी उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
उद्योजक अभिजित श्रीकृष्ण भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची नऱ्हे येथे ट्रांन्सफॉर्मरची कंपनी आहे. त्यांची गाडी सहा मे रोजी रात्री कात्रज महामार्गावर आर्यन स्कुलजवळ सहा जणांनी अडवली. त्यातील एकाने चाकुचा धाक दाखवून इतरांनी मारहाण केली.
गाडी चालवताना धक्का लागला असेल असा समज करुन भोळे यांनी मारहाणीकडे दुर्लक्ष केले. यानंतर त्यांना शुक्रवारी व्हॉटसअपवर एक कॉल आला. समोरच्याने आम्हाला पेमेंट पाहिजे, त्या दिवशी तू वाचलास, तुझ्या कुटुंबाची सर्व माहिती माझ्याकडे आहे, तुझ्या जीवाची किंमत काय करतो? सांग असे धमकावले. तसेच तुला दोन वेळा डेमो दाखवला आहे, एकदा कात्रज चौकात आणि एकदा दत्तनगर चौकात अशी आठवण करुन दिली.
यावर फिर्यादीने किती पैसे अशी विचारणा करता, तुझ्या जीवाची किंमत 50 लाख रुपये, तूला परत दोन दिवसांत तीसरा मोठा डेमो दाखवतो असा दम भरला. यावर फिर्याद आणि त्याच्या वडिलांनी थोडा वेळ मागीतला. यावर आरोपीने उद्या संध्याकाळपर्यंतची वेळ देतो, तु कोठेही तक्रार कर आम्हाला फरक पडत नाही असे म्हटले. यानंतर पुन्हा आरोपीने कॉल करुन धमकी दिली. फिर्यादीने नातेवाईक आणि मित्रांशी चर्चा केल्यानंतर तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करत आहेत.