पुणे – मानसिक त्रास देणाऱ्या प्रेयसीचा खून करुन तीचे तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी टाकणाऱ्या प्रियकरास खंडणी विरोध पथकाने जेरबंद केले आहे. त्याने गळा आवळून खून केल्यावर तीचे मुंडके व हात-पाय कापून वेगवेगळे केले. यानंतर हे तुकडे पोत्यात भरुन लवासा घाट परिसरात ठिकठिकाणी टाकून दिले होते.
रोजिना रियाज पानसरे ऊर्फ कविता चौधरी असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तर हनुमंत शिंदे( रा. बुधवार पेठ, पुणे) याला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना खबर मिळाली होती की रोझिना 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता आहे. तिचेबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे मिसींग दाखल असून तीचे हनुमंत शिंदे याचे सोबत अनैतिक संबध होते. त्यानूसार हनुमंत शिंदेला ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, रोजिनाला सदनिका भाडयाने घेऊन दिली होती. तो तिचेकडे अधुनमधुन जात-येत असे. मात्र विवाह झालेला असल्याने घरी देखील जात असे, ही बाब सदर रोझिनाला खटकत होती, त्यामुळे ती घरी जात जाऊ नको, माझ्यासोबतच रहा असे बोलून शिवीगाळ करुन सतत टार्चर करत होती.
तीने 12 ऑगस्ट रोजी तु दिवसभर का घरी आला नाहीस असे बोलून वाद केला व शिवीगाळी केली. त्यामुळे रागाचे भरात तीचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर सदनिका बंद करुन अक्कलकोट येथे निघुन गेलो. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी रात्री मित्राचा चारचाकी छोटा टेम्पो घेऊन रोझिनाच्या सदनिकेवर गेलो. तेथे धारदार शस्त्राने तीच्या मृतदेहाचे तुकडे केले व ताडपत्रीच्या पिशवीत भरुन भुगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळया ठिकाणी टाकुन दिले. त्यानूसार त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत शिंदेचा बुधवार पेठेतच मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. तेथेच तो कुटूंबासोबत रहात होता. त्याला पत्नी व दोन मुले आहेत.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, पालीस अंमलदार मधुकर तुपसौंदर, रवींद्र फुलपगारे, प्रवीण राजपुत, अतुल साठे, नितीन कांबळे, रमेश चौधर, अमोल आवाड, दुर्याधन गुरव, गजानन सोनवलकर, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, नितीन रावळ, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, पिराजी बेले, हनुमंत कांदे यांनी ही कारवाई केली.