मुंबई – गुंतवणूकदारांची तब्बल 684 कोटी रूपयांची फसवणूक करणाऱ्या एका 55 वर्षीय व्यावसायिकाला मुंबई क्राईम ब्रॅंच पोलिसांनी अटक केली आहे. नंदलाल केसरसिंह असे या आरोपीचे नाव असून तो मुळचा नेपाळचा रहिवासी आहे. तो फिनॉमिनल ग्रुप ऑफ कंपनीचा चेअरमन आहे. त्याला पोलिसांनी दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलातून ताब्यात घेतले.
तो 2018 पासून आपली अटक टाळत आला आहे. त्यासाठी तो सारखा राहण्याचे ठिकाण बदलत होता. गेली दोन वर्षे तो देशाबाहेरही वास्तव्याला होता. त्यानंतर तो देशात आला आणि नॉयडा आणि मुंबईतील विविध हॉटेलांमध्ये तो नाव बदलून राहात होता.
त्याने आपल्या कंपनीत गुंतवणुकीचे आवाहन करून गुंतवणुकदारांना मोठ्या मोबदल्याचे अमिष दाखवले होते. त्यानुसार अनेक गुंतवणुकदार त्याच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास बळी पडले. त्यांच्याकडून त्याने तब्बल 684 कोटी रूपयांची गुंतवणूक जमवली आणि नंतर मात्र तो फरार झाला होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि केरळातही गुन्हे दाखल आहेत.