पुणे – शहरात राजकीय व्यक्तींकडे खंडणी मागणाऱ्या गुन्ह्याचा उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. तरुणीने विवाहास नकार दिल्याने दोघांनी तरुणीला त्रास देण्याच्या हेतूने तिच्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर करुन राजकीय नेत्यांना खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी शाहनवाज गाझीय खान (वय 31, रा. गुरूवार पेठ) याला अटक करण्यात आली. तर यापूर्वीच एकाला अटक करण्यात आली आहे. आमदार, माजी नगरसेवक, माजी नगरसेवक पुत्र आणि उद्योजकांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी हे चार गुन्हे दाखल आहेत. त्या
तरुणीची कौटुंबिक परिस्थिती चांगली आहे. कुटुंबीयांची खराडी भागात जमीन आहे. तरुणीच्या कुटुंबीयांच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्यांनी विवाहाबाबत विचारणा केली होती. मात्र, तरुणीने दोघांना नकार दिल्याने दोघांनी हे कृत्य केले.
शाहनवाजने माजी नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश, तसेच एका उदयोजकासह माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांना प्रत्येकी 30 लाख रुपये खंडणी देण्यासाठी दूरध्वनी केले (व्हॉटसऍप कॉल) केले होते. राजकीय नेत्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपी इम्रान समीर शेख याने पुणे मॅरेज ब्युरो ग्रुप समाजमाध्यमावर सुरु केला होता. या समुहाचा प्रमुख इम्रान समीर शेख होता.
आरोपी शाहनवाज समाजमाध्यमातील समुहात सदस्य होता. खराडी भागातील एका तरुणीने संबंधित समुहावर विवाहाबाबत माहिती आणि छायाचित्र प्रसारित केले होते. इम्रानने शाहनवाजचे स्थळ तरुणीला सुचविले होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी शाहनवाजला नकार दिला. त्यानंतर इम्रानने तरुणीला विवाहासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर इम्रानला नकार देण्यात आला. इम्रानने तरुणीला त्रास देण्यासाठी तिची बदनामी केली. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात इम्रानला अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत होता.
आरोपी इम्राने तरुणीची बदनामी केली होती. आरोपी शाहनवाजने तरुणीला त्रास देण्यासाठी राजकीय नेत्यांना खंडणी मागण्याचा कट रचला. त्याने राजकीय नेत्यांचे मोबाइल क्रमांक मिळवले. समाजमाध्यमातील दूरध्वनी सेवेचा (व्हॉटसऍप) गैरवापर करुन त्यांनी राजकीय नेत्यांकडे प्रत्येकी 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. शाहनवाजने खंडणीची रक्कम तरुणीच्या मोटारीत ठेवण्यास सांगितले. या प्रकरणात तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. कोणीतरी खोडसाळपणे तरुणीला त्रास देण्यासाठी हा प्रकार करत असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरु केला. तेव्हा आरोपी इम्रान आणि शाहनवाज खंडणी प्रकरणात सामील असल्याचे उघडकीस आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, विजय गुरव, विनोद साळुंखे, प्रदीप शितोळे, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे आदीनी या प्रकरणाचा तपास केला.