प्रयागराज – माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येच्या घटनेमुळे देशभर खळबळ निर्माण झाली आहे. त्यावर अनेक जण उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशातील एका कॉंग्रेस नेत्यानेही प्रतिक्रिया दिल्यामुळे हा कथित नेता अडचणीत आला असून कॉंग्रेसने त्याला दिलेली उमेदवारी मागे घेतली आहे.
राजकुमार उर्फ रज्जू भैय्या असे या नेत्याचे नाव असून त्याने अतिक अहमदला भारत रत्न देण्याची मागणी केली होती व त्याला शहीदही म्हटले होते.
सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कॉंग्रेसचीही डोकेदुखी वाढली आहे व पक्षाला टीकेचा सामना करावा लागतो आहे. प्रयागराजच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका निवडणुकीत राजकुमार याला कॉंग्रेसने तिकीट दिले होते.
त्यासंदर्भातील आपल्या प्रचारात त्याने सरकारला अतिकचे मारेकरी म्हणत या वादग्रस्त मागण्या केल्या. कॉंग्रेस पक्षाने राजकुमारचे तिकीट रद्द केले आहे. तसेच त्याची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली आहे.